काळा अवाक
शास्त्रीय नाव | स्यूडिबिस पॅपिलोसा [टीप १] |
---|---|
अन्य नावे | काळा कंकर |
कुळ | अवाकाद्य |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश |
रेड-नेप्ड आयबिस [टीप २] ब्लॅक आयबिस[टीप ३] |
संस्कृत | आटी, रक्तशीर्ष |
हिंदी | कडाकुल, करंकुल |
काळा अवाक (शास्त्रीय नाव: Pseudibis papillosa, स्यूडिबिस पॅपिलोसा ; इंग्लिश: Red-naped Ibis / Black Ibis, रेड-नेप्ड आयबिस / ब्लॅक आयबिस ;) ही अवाकाद्य पक्षिकुळातील दक्षिण आशियात आढळणारी एक प्रजाती आहे. हे पक्षी साधारण ६८ सें.मी. आकारमानाचे असतात. यांचा मुख्य रंग विटकरी काळा असून, चोच तपकिरी रंगाची आणि बाकदार असते. यांच्या खांद्यावर ठळक पांढरा भाग असतो. डोक्यावर पिसांचा अभाव असून डोक्याचा मुख्य रंग काळा, तर त्यावर मागील बाजूस साधारण त्रिकोणी आकाराचा ठळक लाल तुरा असतो. काळ्या अवाकांत नर व मादी दिसायला सारखेच असतात.
आढळ
[संपादन]हे पक्षी दक्षिण आशियात आढळतात. भारताच्या मुख्य भूमीत, कोरड्या हवामानाच्या प्रदेशात हा पक्षी सर्वत्र आढळत असून तो पाकिस्तानामध्येही आढळतो. बांगलादेशामध्ये याची वेगळी उपजात आढळते.
नद्या, तलाव, भातशेतीच्या प्रदेशात तसेच दलदली भागात राहणे याला पसंत असले तरी हा पांढऱ्या अवाकाएवढा पाण्यावर अवलंबून नसतो. काळा अवाक पाण्याजवळच्या भागातही आपले खाद्य शोधत फिरतो. सहसा एकाच प्रदेशात राहणे याला पसंत आहे, हा आपला ठरलेला प्रदेश सोडून अन्यत्र जात नाही. काळा अवाक जोडीने किंवा छोट्या थव्यात राहणे पसंत करतो. बगळ्यांसारखे काळे अवाकही सकाळ-संध्याकाळ एकाच झाडावर किंवा उंच ठिकाणी एकत्र जमतात आणि मोठा कलकलाट करतात.
खाद्य
[संपादन]उथळ पाण्यात चोच बुडवून एकट्याने आणि लहान-मोठ्या थव्याने हे पक्षी दिवसभर खाद्य शोधत फिरतात. सरडे, गोगलगाय, बेडूक, मासोळ्या, खेकडे वगैरे पाण्यात राहणारे जीव काळ्या अवाकांचे खाद्य आहे.
प्रजनन
[संपादन]मार्च ते ऑक्टोबर हा या पक्ष्याचा विणीचा काळ असून याचे घरटे मोठे, काटक्या, पिसे वगैरे वापरून केलेले असते. पाण्यापासून दूरच्या उंच झाडावर अवाक आपले घरटे बांधतो किंवा इतरांनी सोडून दिलेले आयते घरटे वापरतो. याचे घरटे झाडावर इतर पक्ष्यांसोबत असते. मादी एकावेळी २ ते ४ फिकट हिरव्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते.
चित्रदालन
[संपादन]तळटिपा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- "काळ्या अवाकांची चित्रे, आवाजांची ध्वनिमुद्रणे व अन्य माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |