ब्रह्मपुरीश्वर मंदिर
ब्रह्मपुरीश्वर मंदिर | ||
नाव: | ब्रह्मपुरीश्वर मंदिर | |
---|---|---|
स्थान: | ||
स्थापत्य: | द्राविडी स्थापत्यशास्त्र | |
स्थान: | तमिळनाडू, भारत | |
भारतातील तमिळनाडू राज्यांत तिरुचिरापल्लीजवळील तिरुप्पट्टूर नामक छोट्या गावातले हे ब्रह्मपुरीश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. [१] ह्या स्थळी येऊन ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त केल्यास भाविकांचे विधिलिखित बदलून मंगलकारी होते असा श्रद्धाळूंचा विश्वास आहे. भारतात ब्रह्मदेवाचे एकच मंदिर असल्याच्या सर्वसाधारण मान्यतेस छेद देणाऱ्या मंदिरांपैकी हे एक असून, ब्रह्मदेवाची अशी इतरही अनेक मंदिरे दक्षिणी भारतात आहेत.
आख्यायिका
[संपादन]स्वर्गलोकी एकदा ब्रह्मदेव व विष्णू ह्या दोन देवांमध्ये आपापसातील श्रेष्ठतेवरून विवाद झाला. ह्या दोहोंतील कडाक्याच्या तंट्यावर निर्णय करावा म्हणून महादेव एका देदीप्यमान अग्निस्तंभाच्या स्वरूपात प्रकट झाले. ह्या अग्निस्तंभाचा आदी आणि अंत जो कोणी शोधून काढेल तोच श्रेष्ठ असे ठरले. अग्निस्तंभाचा आदी शोधावयास ब्रह्मदेव हंसरूपाने अवकाशात गेले, तर भगवान विष्णू एका वराहाचे रूप घेऊन पाताळात गेले. अथक यत्न करूनदेखील कुणासही कसलाच थांगपत्ता लागेना. तेव्हा दोघेजण भगवान महादेवासमीप आले. विष्णूंनी अग्निस्तंभाचे मूळ सापडू न शकल्याचे मान्य केले, परंतु ब्रह्मदेवांनी गोमातेस आणि केवड्याच्या झाडास स्वतःच्या पक्षाकडे वळवून घेत ब्रह्मदेवांना अग्निस्तंभाचा आदी सापडला आहे असे असत्य प्रतिपादन करण्यास प्रवृत्त केले. स्वतः विश्वसृजनकर्ता असल्याने आपण भगवान महादेवापेक्षाही श्रेष्ठ आहोत असा गर्व ब्रह्मदेवांस झाला. ह्यामुळे क्रोधायमान होवून भगवान महादेवांनी ब्रह्मदेवांचे पाचवे मस्तक छेदले आणि त्यांस "तू हंस होशील" असा शाप दिला.
उत्तरकथा
[संपादन]पश्चातबुद्धीने ब्रह्मदेवांनी पृथ्वीतलावर येऊन क्षमायाचनेकरिता महादेवांच्या क्षेत्रांची यात्रा आरंभिली. "पुण्णकवनम्" नामक ह्या पुण्यक्षेत्री एका तळ्याची आणि ह्या मंदिराची निर्मिती केली. तेथे स्वयंभूलिंगस्वरूपात प्रकट झालेल्या महादेवाची आराधना करून ब्रह्मदेवांनी तप करावयास आरंभ केला. ब्रह्मदेवांची भक्ती पाहून भक्तवत्सल महादेव प्रसन्न झाले. त्यांनी येथील मगिळवृक्षाखाली ब्रह्मदेवांस दर्शन दिले, आणि त्यांस शापमुक्त करून त्यांची विश्वसृजनशक्ती पुनर्प्रस्थापित केली. हंसरूपांतून मुक्त होऊन भगवान ब्रह्मदेवाने पुनः सृष्टिनिर्मितीस आरंभ केला. विश्वाचे विधिलिखित लिहिणारे भगवान ब्रह्मदेव, स्वतः त्यांचेच विधिलिखित ह्या ठिकाणी बदलले गेल्यामुळे, आता त्यांनी ह्या ठिकाणी येणाऱ्यांचे विधिलिखित बदलावे असा आदेश भगवान महादेवांनी ब्रह्मदेवांस दिला.
प्रथा
[संपादन]महादेवांचा प्रकटोत्सव समारंभ येथे प्रतिवर्षी मार्गशीर्ष महिन्यांतील मघा नक्षत्रदिनी साजरा केला जातो. स्वतः भगवान ब्रह्मदेवांनी येथे भगवान महादेवांच्या स्वयंभूलिंगाची उपासना केल्यामुळे, या स्वयंभूलिंगास "श्री ब्रह्मपुरीश्वर" हे नामाभिधान प्राप्त झाले.
व्यवस्थापन
[संपादन]हे मंदिर तमिळनाडू राज्य शासनाच्या दि हिंदू रिलीजियस अँड चॅरिटिबल एन्डोमेन्ट्स डिपार्टमेन्टच्या व्यवस्थापनाखाली येते.
मुख्य मंदिराच्या प्रांगणातील उपमंदिरे
[संपादन]येथे भगवान श्री ब्रह्मपुरीश्वर हे प्रमुख उपास्य दैवत असून स्वयंभूलिंगस्वरूपात प्रतिष्ठित आहेत. येथे देवी ब्रह्मसंपद्गौरींचे उपमंदिर आहे. भगवान ब्रह्मदेवांचे वेगळे मंदिर शेजारीच आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेवांची मूर्ती ही ध्यानस्थरूपांत कमलदलांवर पद्मासनस्थित आहे. प्रख्यात योगसूत्रांचे जनक महर्षी पातंजली ह्यांची समाधी ह्याच मंदिराचे आवारात आहे.
प्रांगणातील १२ शिवमंदिरे
[संपादन]ह्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी स्थापिलेली आणि आराधिलेली एकूण १२ शिवलिंगे आहेत. प्रत्येक शिवलिंग हे येथील ब्रह्मतीर्थासभोवताली वेगवेगळ्या उपमंदिरांत आहे. भगवान ब्रह्मदेवांनी येथे ज्या तळ्याची निर्मिती केली त्या तळ्यास ’श्रीब्रह्मतीर्थ’ म्हणतात. ह्याच ब्रह्मतीर्थातील पाण्याने स्वयंभूलिंगावर अभिषेकाराधना इत्यादी होते. ह्या मंदिराचे प्रांगणातील १२ शिवमंदिरे येणेप्रमाणे:
- श्री ब्रह्मपुरीश्वर (प्रमुख उपास्य दैवत)
- श्री पळणीमलयनाथ
- श्री पाताळेश्वर
- श्री तायुमानवर
- श्री मुकुटनाथ
- श्री एकांबरेश्वर
- श्री अरुणाचलेश्वर
- श्री कैलासनाथ
- श्री जंबुकेश्वर
- श्री कालहस्तिनाथ
- श्री सप्तगिरीश्वर
- श्री सुदर्शनेश्वर
पूरक माहिती
[संपादन]संदर्भ
[संपादन]http://en.wikipedia.org/wiki/Brahmapureeswarar_Temple