भाऊसाहेब महाराज उमदीकर
भाऊसाहेब महाराज उमदीकर (इ.स. १८४२ अंदाजे - इ.स. १९१४) हे महाराष्ट्रातील आध्यात्मिक गुरू होते.
जीवन
[संपादन]महाराष्ट्रातील उमदी येथे यांचा जन्म शके १७६४ चैत्र शुद्ध नवमी या दिवशी झाला. उमदीच्या खंडेराव देशपांडे यांचे पुत्र भाऊसाहेब हे लहानपणापासून मारुतीचे उपासक होते. भाऊसाहेब नेमाने मारुतीच्या दर्शनासाठी येत. भाऊसाहेब महाराजांची भक्ती पाहून हा मुलगा अनुग्रह देण्यास योग्य आहे, असा विचार करून रघुनाथप्रिय महाराज भाऊसाहेबांना गुरुलिंग जंगम महाराजांकडे घेऊन गेले व गुरुलिंग जंगम महाराजांनी भाऊसाहेब महाराजांना अनुग्रह दिला.
महाराजांकडून घेतलेल्या नामाची कठोर साधना भाऊसाहेब महाराजांनी केली. सकाळी २ तास सायंकाळी ३ तास रात्री ३ तास साधना ते न चुकता करत असत.
असेच एका दिवशी गुरुलिंग जंगम महाराज आजारी असल्याची बातमी भाऊसाहेब महाराजांना कळली. ताबडतोब ते निमबिर्गीला गेले. भाऊसाहेब महाराजांना पाहिल्यावर गुरुलिंग जंगम महाराजांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव उमटले. गुरुलिंग जंगम महाराजांनी भाऊसाहेब महाराजांना ज्ञानेश्वरीचा ८वा अध्याय वाचायला सांगितला.
भाऊसाहेब महाराजांनी सर्व जाणले होते. सायंकाळी ६ वाजता गुरुलिंग जंगम महाराजांनी मौन धारण केले व याच दिवशी म्हणजेच २७ मार्च १८८५ रोजी, रात्री १२ वाजता गुरुलिंग जंगम महाराजांनी हात उचावून भाऊसाहेब महाराजांना गुरुभक्ति व शिष्य परंपरा चालू ठेवण्याची आज्ञा केली व ते पंचत्वात विलीन झाले.
यापुढे गुरुबंधूंच्या सान्निध्यात साधना करून त्यांच्यासह महाराजांच्या आठवणीत भक्तिभाव वाढवायचा असे भाऊसाहेब महाराजांनी ठरवले. त्यांनी महाराष्ट्रात व कर्नाटकात तसेच भारतभर इंचगिरी संप्रदायाच्या माध्यमातून भक्ती मार्गाचा प्रचार व प्रसार केला.
इ.स. १९१४ साली त्यांनी आपला देह ठेवला .
शिष्यपरंपरा
[संपादन]भाऊसाहेब महाराजांनी अनेक शिष्य घडवले. त्यांचे काही प्रमुख शिष्य
- सिद्धरामेश्वर महाराज (पाथरी सोलापूर)
- अंबुराव महाराज
- गुरुदेव रानडे महाराज